खुलताबाद, (प्रतिनिधी)
: तालुक्यातील वेरूळ परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून, रानडुकरांच्या कळपाने एका एकरावरील मका पिकाचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गट क्रमांक ४०९ मधील अल्पभूधारक शेतकरी नईम नूर शेख यांचे काढणीला आलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने त्यांचे सुमारे ८० ते ९० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झाला असून वन विभागाने तात्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे. शेतकरी नईम शेख यांच्याकडे दोन एकर शेती असून, त्यातील एक एकरावर त्यांनी मोठ्या कष्टाने मका पिकाची लागवड केली होती. बियाणे, मशागत, खते व कीटकनाशकांसाठी आतापर्यंत ३० हजारांहून अधिक खर्च झाला होता. पीक जोमदार आले असून कणसेही दाण्यांनी भरली होती. अवघ्या काही दिवसांत काढणी सुरू होणार होती; मात्र अचानक रानडुकरांच्या कळपाने शेतात घुसून संपूर्ण पीक पायाखाली तुडवून फस्त केले.
तोंडाशी आलेला घास हिरावला
माझा हातावरचा संसार असून कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. पिकासाठी कर्ज काढून मोठा खर्च केला होता. मात्र, काढणीच्या तोंडावरच रानडुकरांनी सर्वकाही संपवले. शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी.
- नईम नूर शेख,
बाधित शेतकरी














